नांदेड : भरधाव वेगाने धावणार्या वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, नांदेड शहरातील प्रत्येक शाळेसमोर ता

नांदेड : भरधाव वेगाने धावणार्या वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, नांदेड शहरातील प्रत्येक शाळेसमोर तातडीने दोन गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत, अशी मागणी शिवसेना ओबीसी राज्य संपर्क प्रमुख अनिल पाटील धमने यांनी जिल्हाधिकारी, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिडको-हडकोसह शहरातील अनेक मुख्य रस्त्यांलगत असलेल्या शाळांसमोर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत वाहनचालकांकडून निष्काळजीपणे वेगाने वाहन चालविणे, अचानक ब्रेक लावणे तसेच मोठ्या आवाजात हॉर्न वाजविणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. विशेषतः इंदिरा गांधी हायस्कूल, शिवाजी विद्यालय (सिडको), छत्रपती शिवाजी विद्यालय, कुसुमताई हायस्कूल, संतोष कन्या प्राथमिक शाळा यांसह मुख्य रस्त्यावरील सर्व शाळांसमोर दोन गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहून संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी. भविष्यात शाळांसमोर भरधाव वाहनांमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल पाटील धमने यांनी सादर केले.

COMMENTS