नांदेड : आषाढी एकादशीनिमित्त सुयोग किड्झ अँड इंटरनॅशनल स्कूलमध्ये वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारी भक्तिमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. लहानग्या वि

नांदेड : आषाढी एकादशीनिमित्त सुयोग किड्झ अँड इंटरनॅशनल स्कूलमध्ये वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारी भक्तिमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. लहानग्या विद्यार्थ्यांनी वारकर्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, तुळशीची माळ, भगवी पताका आणि विठ्ठलनामाच्या गजरात दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्यासह महाराष्ट्रातील संतपरंपरा, भगवान विठ्ठलावरील अखंड भक्ती आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. दिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, भक्ती, सामाजिक ऐक्य आणि नैतिक मूल्यांचा संदेश दिला. वारकर्यांच्या वेशातील बालचमूने साकारलेले हे विठ्ठलमय वातावरण उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. यावेळी संस्थेचे संचालक जयेंद्र बरारा, प्राचार्य डॉ. अमन बरारा, शाळेतील सर्व शिक्षिका, कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. भारतीय संस्कृती आणि परंपरेशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणारे असे उपक्रम त्यांच्या मनात संस्कार, श्रद्धा, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अभिमान रुजविण्यास मोलाची भूमिका बजावतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

COMMENTS