भोकर: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष

भोकर: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भोकर शहरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप वगळता विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी व नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने शहर पूर्णपणे बंद राहिले.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने, किरकोळ दुकाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्याने शहरात पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बंददरम्यान विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार विनोद गुंडमवार यांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा तीव्र निषेध नोंदविला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), एमआयएम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भीम टायगर सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, बहुजन लोकपथ पक्ष तसेच इतर सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ॲड. सिद्धार्थ कदम, दिलीप राव, आनंदराव एडके, सुभाष तेले, ज्ञानू चव्हाण, गौतम चव्हाण, अनिता वाघमारे, पुंडलिक कांबळे, काँग्रेसचे गोविंदबाबा गौड, निळकंठ वर्षेवार, एल. एल. हिरे, सुरेखा माळे, जगदेवराव देशमुख, ॲड. शिवाजी कदम, आदिनाथ चिंताकुटे, मनसेचे नेते तथा नगरसेवक साईनाथ जटलवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे सुभाष नाईक, पांडुरंग वर्षेवार, एमआयएमचे जुनेद पटेल, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पोतरे व शिवाजी गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हा प्रवक्ते पत्रकार अनिल डोईफोडे, पत्रकार अशोक वाघमारे, लॉ स्व तालुका अध्यक्ष मारोती टिकेकर, शेतकरी संघटनेचे अवधूत पाटील, आशिष सोनुळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS