बीड: जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहरात नागरिकांना आठ ते दहा दिवसांनीच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून, तेही गढूळ, दूषित व दुर्गंधीयुक्त असल्या

बीड: जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहरात नागरिकांना आठ ते दहा दिवसांनीच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून, तेही गढूळ, दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणार्या पाण्यात माती, कचरा तसेच दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. हे दूषित पाणी वापरल्यामुळे अतिसार, कॉलरा, टायफॉईड, कावीळ यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढला असून डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि तापाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचा दावा शेख युनूस यांनी केला.
विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे ठिकाण असूनही नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहरातील दवाखाने जलजन्य आजारांच्या रुग्णांनी भरलेले आहेत, तरीही प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका शेख युनूस यांनी केली.
यावेळी त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, पुढील ४८ तासांत स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर सर्व नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच दूषित पाणीपुरवठ्याची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

COMMENTS