पुणे: अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली

पुणे: अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवणूक तसेच अन्नसुरक्षा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्याने पुणे विभागातील १२ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील १० तर सातारा जिल्ह्यातील २ आस्थापनांचा समावेश आहे. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष मोहिमेत उघडकीस आल्या त्रुटी
एफडीएच्या पथकाने १८ आणि २१ जुलै दरम्यान पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिसर, कालबाह्य अन्नपदार्थांचा साठा, अन्न हाताळणीतील निष्काळजीपणा तसेच स्वच्छतेच्या निकषांचे गंभीर उल्लंघन निदर्शनास आले. ही कारवाई पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ, जुन्नर, खेड आणि सातारा जिल्ह्यातील वडूज परिसरातील आस्थापनांवर करण्यात आली.
परवाने निलंबित झालेल्या आस्थापना:
- पुणे जिल्हा: जोकर हॉस्पिटॅलिटी (बालेवाडी), रेड अँड ह्युज (कल्याणीनगर), टोणी दा ढाबा (नायगाव कामशेत, ता. मावळ), हॉटेल लोकप्रिय (मार्केट यार्ड), फाऊंटन प्युअर व्हेज (आळेफाटा, ता. जुन्नर), के. एम. फुड्स (भांबुरवाडी, ता. खेड), अक्सा बेकरी (आदर्श नगर, पीसीएमसी), जय सद्गुरू इराणी चहा अँड स्नॅक्स सेंटर (मार्केट यार्ड), फोक्लो टेक्नॉलॉजी प्रा. लि. आणि स्वींस्टा एन्ट प्रा. लि. (बावधन).
- सातारा जिल्हा: शालीमार उडपी व्हेज रेस्टॉरंट (वडूज, ता. खटाव) आणि सुरभी हॉटेल अँड बार (वडूज, ता. खटाव).
३ लाख ४८ हजारांचा प्रतिबंधित साठा जप्त; ५ जणांना अटक

या कारवाईशिवाय १६ ते २१ जुलैदरम्यान चिंचवड, पंढरपूर आणि वडूज येथे तीन ठिकाणी स्वतंत्र छापे टाकण्यात आले. यात ३ लाख ४८ हजार ७८ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
एफडीएचे व्यावसायिकांना कडक निर्देश
एफडीएने सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांना अन्नसुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी देणे, फूड ग्रेड पॅकिंग साहित्य वापरणे, विनापरवाना व्यवसाय न करणे, वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे आणि मेनू कार्डवर दिशाभूल करणारी माहिती न देण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच ग्राहकांना अन्नपदार्थांचा दर्जा किंवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS