Homeताज्या बातम्या

‘साहित्यवेल’तर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा साहित्यिक सन्मान

श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये १९७७ पासून वाचन, लेखन, समाजप्रबोधन आणि वाचन प्रसार चळवळ सातत्याने जोपासणारे ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ व समाजाभि

पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचा केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा; खासदार शशी थरूर यांची टीका
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना धमकी दिल्याचे प्रकरण तापले; DMK आमदार मार्कंडेयन यांचा जामीन अर्ज फेटाळला
आनंदसरी बरसल्या; उशिरा का होईना मान्सूनच्या दमदार हजेरीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये १९७७ पासून वाचन, लेखन, समाजप्रबोधन आणि वाचन प्रसार चळवळ सातत्याने जोपासणारे ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ व समाजाभिमुख विचारवंत डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा साहित्यवेल प्रकाशन व वाचन प्रसार चळवळ, सातारा यांच्या वतीने साहित्यिक सन्मान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे उगवत्या पिढीला प्रेरणा देणारा आणि वाचन संस्कृती बळकट करणारा असल्याचे प्रतिपादन साहित्यवेलचे संस्थापक-अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.

यावेळी बोलताना प्रा. डॉ. वाघमारे म्हणाले, “महाविद्यालयीन जीवनापासूनच डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वाचन, लेखन आणि समाजसेवेचा ध्यास घेतला आहे. १९८४ ते १९८९ या कालावधीत सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ते आम्हाला मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही वाचन, लेखन आणि साहित्यनिर्मितीकडे आकर्षित झालो. त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजे आमच्यासाठी गुरुदक्षिणेचा भावपूर्ण क्षण असून नव्या पिढीसाठी तो प्रेरणेचा दीप आहे.” याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. सुनीताताई वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे जीवन व कार्य दीपस्तंभासारखे – डॉ. बाबुराव उपाध्ये

सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, “साहित्यवेलतर्फे झालेला हा सन्मान म्हणजे ज्ञाननिष्ठ आणि कर्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाने केलेला सन्मान आहे. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे आणि मुख्याध्यापिका सौ. सुनीताताई वाघमारे यांनी रयत शिक्षण संस्थेत अत्यंत तळमळीने, प्रामाणिकपणे आणि विवेकनिष्ठ भावनेने सेवाकार्य केले. त्यांचा संपूर्ण परिवारही याच सेवाभावी संस्कारांचा वारसा जपत आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या कुटुंबाकडे पाहताना येतो.” यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनीही प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व सौ. सुनीताताई वाघमारे यांचा सत्कार करून त्यांच्या साहित्य, शिक्षण आणि समाजसेवेबद्दल गौरवोद्गार काढले.

मुख्याध्यापिका सुनीताताई वाघमारे यांनी मनोगतात सांगितले की, शिक्षणक्षेत्रात कार्य करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जीवनसंघर्ष व सेवाभाव सदैव प्रेरणास्थानी राहिला. संसार, कुटुंब आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या यांचा समतोल राखत सेवाकार्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉ. बाबुराव उपाध्ये आणि प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्यातील गुरु-शिष्य नाते हे परस्पर आदर, स्नेह आणि संस्कार यांचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुमित वाघमारे यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS