Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मायबाप’ मैफिलीतून पितृस्मृतींना उजाळा!

 मालेगाव:- 'मायबापाची विसरू नका कीर्ती तेच आपले आभाळ आपली धरती         सांभाळती दौलत लेकरांची... ...     &nbs

कोरोणाची तिसरी लाट रोखण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज, आ,निलेश लंके l पहा LokNews24
राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी
९० किलो गांजा 17 लाखांच्या मुद्देमालासह ३ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

 मालेगाव:- ‘मायबापाची विसरू नका कीर्ती तेच आपले आभाळ आपली धरती

        सांभाळती दौलत लेकरांची… …

        जाळून जीवाच्या ज्योती… … …!’

     असं म्हणत पित्यासह मातेच्या आठवणींचा जागर करत ‘मायबाप’ या आईवडिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या काव्यमैफिलीच्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस कविता सादर करत पितृस्मृतींना अनोखा उजाळा देण्यात आला.

     निमित्त होते मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी (वडनेर) येथील माधवराव त्र्यंबक पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे. राज्यभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत ‘मायबाप’ या कार्यक्रमातून पित्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

     ख्यातनाम कवी राजेंद्र उगले आणि अरुण इंगळे यांनी उपस्थितांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले.

        ‘बाप सोडून जाताना…

        सुन्या झाल्या दाही दिशा

        झाला पोरका भूगोल

        आणि फाटला नकाशा…’

     असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलेला संसार आणि भरलेलं गोकुळ सोडून जाणाऱ्या बापाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी युवाकवी प्रशांत केंदळे यांच्यासमोर त्यांच्या सादर केलेल्या-

        ‘बाप मनात जपतो

        लेक त्याची सोनपरी

        तरी जिवाचा जिवडा

        देतो परक्याच्या घरी…’

या कवितेने साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी उभे केले. या कार्यक्रमाचे निवेदन करताना कवी रवींद्र मालुंजकर यांनी ‘माय अंगुळ करिती, पाणी व्हात-व्हात जाई, थेट पंढरपुरात, त्याची चंद्रभागा होई…’ लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या कवितेतील आईच्या पावित्र्याचा दरवळ पेरला. मैफिलीत सादर झालेल्या कवी प्रा.राजेश्वर शेळके यांची ‘बूट आणि टाय,’ कवी विजयकुमार मिठे यांची ‘काय देऊ पोरी तुला,’ कवी काशीनाथ वेलदोडे यांची ‘झाडाच्या पानापानात,’ गझलकार गौरवकुमार आठवले यांची ‘लक्तरांची जिंदगी जोडीत गेला बाप माझा…’ अशा विविध कवितांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्ञानेश्वर कर्पे (तबला) आणि प्रा.नरेंद्र जाधव (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. अहिराणी वैभव डॉ.एस.के.पाटील, नितीन पवार, नितीन शिंदे, सुभाष बर्डे, शाहुल वानखेडे, म.का.आहेर, प्रवीण गरुड यांच्यासह परिवाराचे आप्तेष्ट-नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिभाऊ पाटील, कडू पाटील, ग्यानदेव पाटील, विक्रम पाटील, राकेश पाटील, छाया पाटील, ताराबाई पाटील, भिलाजी पाटील, दीपक पाटील, सुवर्णा पाटील, ललिता पाटील आणि पाटील परिवाराने केले.

COMMENTS