नांदेड: हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याच्या प्र


नांदेड: हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असताना, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील घडामोडींनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस शिक्षण विभागात भेट दिली; मात्र आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतवे लागल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे करत आहेत. सुनील मोरे यांच्या आत्महत्येनंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्कालीन व विद्यमान अधिकारी तसेच काही शिक्षकांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाच्या अनुषंगाने मागवण्यात आलेल्या नोंदी आणि अधिकृत कागदपत्रांबाबत शिक्षण विभागाकडून विलंब होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या मंगळवारी शहरातील ‘फिनिक्स रुग्णालयात’ दाखल झाल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली. त्या उपचारासाठी दाखल झाल्याचे सांगितले जात असले, तरी तपास प्रक्रियेदरम्यान त्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे. त्यांच्या काही निकटवर्ती अधिकाऱ्यांचीही कार्यालयातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित विविध संचिका, नोंदी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विभागातील काही कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्रपणे काम करत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अंतर्गत वातावरणही तापल्याचे दिसून येत आहे. काही कर्मचारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत असून, अधिकारी-कर्मचारी संघर्ष उघडपणे समोर येऊ लागल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, विविध शिक्षक संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथका (SIT) मार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, तपासातून सर्व बाबी स्पष्ट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS