गेवराई: ग्राहक पंचायत महाराष्ट्र, गेवराई शाखेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत सर्वसामान्य नागरिक व ग्राहकांच्या विविध प्र

गेवराई: ग्राहक पंचायत महाराष्ट्र, गेवराई शाखेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत सर्वसामान्य नागरिक व ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जनहिताच्या ११ महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली. प्रशासनाने या सर्व मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गेवराई वकील संघाचे अध्यक्ष अॅड. लहुराव लगड होते. तर वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. पांडुरंग जरांगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीत मंजूर करण्यात आलेले मुख्य ठराव:
- ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत: श्री मंगलनाथ मल्टिपल निधी, छत्रपती मल्टीस्टेट तसेच जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवीदारांच्या रकमा तातडीने परत मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे.
- स्मार्ट मीटरला विरोध: जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे स्मार्ट मीटर त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय बदलण्यात येऊ नयेत.
- नागरी सुविधा व सुरक्षा: नागरिकांना विनामूल्य शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, गेवराई शहरातील राज्य महामार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी रोड दुभाजक उभारणे आणि बंद अवस्थेतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नागरिकांसाठी खुले करणे.
- प्रशासकीय सुधारणा: बीड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत प्रलंबित असलेली ग्राहक संरक्षण परिषद तातडीने स्थापन करणे, महसूल विभागाच्या सेवा व दाखले माफक दरात उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्यात कागदी व प्लास्टिक कपांवर बंदी घालणे.
- अन्न व औषध प्रशासन: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची अन्न भेसळविरोधी कारवाई अधिक प्रभावी होण्यासाठी किमान तीन वर्षे बदली करू नये, असा विशेष ठराव करण्यात आला.
तसेच पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बीड जिल्ह्यातील खासदार व आमदारांचे अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.
या बैठकीचे आयोजन ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी केले होते. बैठकीच्या प्रारंभी सर्व ११ ठरावांचा मसुदा अरुण वायचळ यांनी वाचून दाखवला. या प्रसंगी जानकीराम जोशी, कल्याण स्वामी, मोहनराव राजहंस, श्रेणिक मडकर, कैलास मडकर, तौर वल्लभ, पत्रकार शुभम घोडके, सुधाकर गायकवाड यांच्यासह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS