Homeताज्या बातम्या

मालेवाडी तांडा क्र. १ व २ मध्ये व्यसनमुक्तीचा ऐतिहासिक संकल्प; अवैध दारू निर्मिती-विक्रीवर कायमस्वरूपी बंदीचा ठराव

परळी वै.: मालेवाडी तांडा क्रमांक १ व २ येथे गावातील अवैध दारूच्या समस्येवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण ग

पारधी समाजातील महिलेवर जीवघेणा हल्ला; विनयभंग, लूट व बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप
एअरबॅगचा अनपेक्षित स्फोट ठरला जीवघेणा; मीरा रोड परिसरात २५ वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू
किनवट जवळील अंबाडीत धक्कादायक प्रकार; महिला सरपंचाचा विनयभंग करत सासर्‍यांसह बेदम मारहाण

परळी वै.: मालेवाडी तांडा क्रमांक १ व २ येथे गावातील अवैध दारूच्या समस्येवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण ग्रामसभा पार पडली. या बैठकीत गावात अवैध दारूची निर्मिती, विक्री व सेवन पूर्णपणे बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मालेवाडी तांडा क्रमांक १ व २ येथील ग्रामस्थांनी गावात अवैध दारू निर्मिती, विक्री व सेवनाला कायमस्वरूपी आळा घालण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आयोजित विशेष बैठकीत ग्रामस्थ, महिला, युवक आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीस सरपंच करणकुमार पवार, ग्रामपंचायत सदस्य सुदाम भगवान पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय राठोड, पोलीस पाटील दत्ता डुमणे तसेच तांड्यातील युवक, महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यसनमुक्त आणि शांततामय गाव घडविण्यासाठी सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविला.

यावेळी गावात अवैध दारू तयार करणार्‍या व विक्री करणार्‍या संबंधित व्यक्तींना ग्रामस्थांसमोर समज देण्यात आली. गावाच्या हिताचा विचार करून संबंधितांनी यापुढे कोणत्याही प्रकारची अवैध दारूची निर्मिती अथवा विक्री करणार नसल्याचे जाहीर आश्वासन दिले. बैठकीत भविष्यासाठीही ठोस भूमिका निश्चित करण्यात आली. गावात पुन्हा कोणीही अवैध दारूची निर्मिती, विक्री किंवा साठवण करत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ परस्पर सहकार्याने काम करतील, असेही ठरविण्यात आले.

गावातील महिलांनी या निर्णयाचे विशेष स्वागत करत व्यसनमुक्त गाव ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. युवकांनीही सामाजिक बांधिलकी जपत गावातील कोणत्याही अनिष्ट प्रवृत्तीला थारा दिला जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. मालेवाडी तांडा १ व २ येथील ग्रामस्थांनी सामूहिक जबाबदारीची जाणीव ठेवत घेतलेला हा निर्णय सामाजिक एकतेचे आणि जनसहभागाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

“परळी वैजनाथ तालुक्यातील मालेवाडी तांडा क्रमांक १ व २ हे व्यसनमुक्त, सुरक्षित आणि आदर्श गाव म्हणून ओळखले जावे, हीच आमची भूमिका आहे. अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान होत असल्याचे पाहून ग्रामपंचायतीने ग्रामस्थ, महिला व युवकांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा केवळ ठराव नसून संपूर्ण गावाचा सामूहिक संकल्प आहे. यापुढे गावात कोणत्याही प्रकारची अवैध दारूची निर्मिती किंवा विक्री खपवून घेतली जाणार नाही. गावाच्या विकासासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने या निर्णयाला साथ द्यावी.”

— करणकुमार पवार (सरपंच, मालेवाडी तांडा)

COMMENTS