Homeताज्या बातम्या

खा. बजरंग सोनवणेंकडून महामार्गाच्या कामाची पाहणी; रखडलेल्या कामांत घातले लक्ष

बीड: तेलगाव-बीड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रलंबित कामांची दखल घेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे

शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार
दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन

बीड: तेलगाव-बीड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रलंबित कामांची दखल घेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी रविवारी (दि. १९ जुलै) संपूर्ण महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. महामार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करा, जिथे शेतकऱ्यांच्या स्लिप रस्त्यांच्या मागण्या आहेत, ती कामे उद्याच्या उद्या सुरू करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरत असून, नाल्या न काढल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, ब्रिजजवळ गावात जाण्यासाठी रस्ते शिल्लक राहिलेले नाहीत. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत खा. सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता भोपळे यांना घटनास्थळीच नाल्या काढण्याचे आणि गावा जोडणाऱ्या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

बीड शहरातील बार्शी नाका परिसरात सुरू असलेल्या ‘पूल कम बंधारे’च्या कामाचीही खा. सोनवणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम रखडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, सदरील काम तातडीने पूर्ण करा. कंत्राटदार वेळेत काम करत नसेल तर त्याला दंड करा, काय करायची ती कारवाई करा, पण काम वेळेत झाले पाहिजे, अशा कडक सूचना त्यांनी अभियंता भोपळे यांना दिल्या.

असा झाला खा. सोनवणेंचा झंझावाती दौरा

खा. बजरंग सोनवणे यांच्या या दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता केज येथील ‘पवनसुत निवास’ येथून झाली. सकाळी १० वाजता तेलगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांनी महामार्गाची पाहणी सुरू केली. या धावत्या दौऱ्यात त्यांनी लोणवळ फाटा, कुप्पा फाटा, उपळी गोलाई, बावी, पुसरा/हिवरगव्हाण, मोरवड दत्तमंदिर आणि बाहेगव्हाण फाटा येथे भेट दिली. तसेच बीड तालुक्यातील मैंदा, पोखरी फाटा, घाटसावळी आणि डेकणमोहा येथे भेट देऊन कामाची बारकाईने पाहणी केली.

दोनशे शेतकऱ्यांची निवेदने

या पाहणी दौऱ्यादरम्यान विविध गावांमध्ये तब्बल दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी खा. बजरंग सोनवणे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या व निवेदने दिली. खासदारांनीही शेतकऱ्यांची गार्हाणी ऐकून घेत त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

घाटसावळीकरांकडून खा. सोनवणेंचे जंगी स्वागत!

घाटसावळी येथे रेल्वेचे काम करताना शेतकऱ्यांची घरे व जमिनीचे भूसंपादन न करताच काम रेटण्यात आले होते. हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांनी मागील वर्षी खा. बजरंग सोनवणे यांच्याकडे मांडला होता. सोनवणे यांनी विशेष बाब म्हणून या शेतकऱ्यांच्या मावेजाचा (मोबदल्याचा) नवीन प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर शेतकऱ्यांच्या पदरात हक्काचा मावेजा पडला. याच कृतज्ञतेपोटी घाटसावळी गावात आगमन होताच ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी खा. सोनवणे यांचे जंगी स्वागत करत त्यांचा नागरी सत्कार केला.

COMMENTS