वर्धा : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून वर्धा जिल्ह्यातील विरुळ परिसरात झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून

वर्धा : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून वर्धा जिल्ह्यातील विरुळ परिसरात झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी पुण्याला गेलेले एक कुटुंब घरी परतत असताना त्यांच्या कारला मालवाहू वाहनाची जोरदार धडक बसली. धडकेनंतर कारने पेट घेतल्याने आई-वडील, एका मुलीसह चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, मालवाहू वाहनाच्या चालकाचाही मृत्यू झाला असून क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील टिपले कुटुंब दोन मुलींना घेऊन इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पुण्याला गेले होते. एका मुलीचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर ती पुण्यातच थांबली, तर आई-वडील आणि दुसरी मुलगी चालकासह वर्ध्याकडे परतत होते. मात्र विरुळजवळ समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.प्राथमिक माहितीनुसार, इथेनॉल वाहून नेणाऱ्या वाहनाचा यापूर्वीच अपघात झाल्याने त्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. याचदरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची मालवाहू वाहनाशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारने क्षणार्धात पेट घेतला. आगीत कारमधील चारही जणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे –
- राजेश आनंद टिपले (वय 50)
- सुषमा राजेश टिपले (वय 45)
- जान्हवी राजेश टिपले (वय 16)
- कार चालक (नाव अद्याप स्पष्ट नाही)
- अंकुश लक्ष्मण राऊत (वय 31) – मालवाहू वाहन चालक
तर मालवाहू वाहनाचा क्लिनर गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर इथेनॉल सांडल्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत एका बाजूने वाहतूक सुरू केली. पुलगाव पोलीस, महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेत बचावकार्य केले.या दुर्दैवी अपघातामुळे सालोड हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुण्याला गेलेल्या कुटुंबाचा प्रवास कायमचा संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS