Homeताज्या बातम्या

आष्टी-पाटोदा-शिरूरमधील शाळा बनणार रोल मॉडेल; ‘आमदार श्री शाळा’ उपक्रमाची घोषणामिशन निपुण बीडमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिशन निपुण बीड’ संकल्प कार

रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका
ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस
आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार



जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिशन निपुण बीड’ संकल्प कार्यशाळेत सरकारी शाळांचा दर्जा उंचावून त्यांना जागतिक दर्जाच्या बनविण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यशाळेत आमदार सुरेश धस, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी आ. सुरेश धस यांनी ‘आमदार श्री शाळा’ या अभिनव उपक्रमाची घोषणा केली. आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षक, ग्रामस्थ आणि सरपंचांच्या सहकार्याने निवडक शाळा दत्तक घेऊन त्यांचा रोल मॉडेल शाळा म्हणून विकास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, सोमनाथ वाळके आणि संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात येणार असून शाळा विकासाचा आराखडा तयार केला जाईल. टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही पालकाला आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठविण्याची गरज भासू नये, यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आवश्यक सुविधा आणि अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार धस यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान म्हणाले, या कार्यशाळेचा उद्देश शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे हा आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर भर देत जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर नियमित कार्यशाळा घेण्यात येतील. शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना घडवावे, प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांनी शिक्षकांना आवाहन करताना सांगितले, सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांचे खासगी शाळांकडे होणारे स्थलांतर थांबवून ‘रिव्हर्स मायग्रेशन’ घडवून आणले पाहिजे. पालकांना गुणवत्तापूर्ण आणि इंग्रजी माध्यमासारखे कौशल्य असलेले शिक्षण हवे आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणाचा दर्जा वाढवून शंभर टक्के विद्यार्थी साक्षर करण्याचा संकल्प करावा. विद्यार्थ्यांना समजून घेणे, ‘विषय मित्र’ संकल्पना प्रभावीपणे राबविणे, विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि निरोगी स्पर्धेची भावना निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी शाळाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होऊ शकतात. प्रत्येक शिक्षकाने ‘मी माझी शाळा जागतिक दर्जाची घडवीन’ असा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाबळेवाडी शाळेच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत दत्तात्रय वारे यांनी आमदार सुरेश धस यांच्या सहकार्याचे कौतुक केले. आष्टी-पाटोदा-शिरूरमधील शिक्षक भाग्यवान आहेत. त्यांच्या पाठीशी सह्याद्रीसारखा नेता उभा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित शिक्षकांनी ‘मिशन निपुण बीड’ यशस्वी करण्याचा आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण, आधुनिक व जागतिक दर्जाची बनविण्याचा संकल्प केला. यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे, शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री चव्हाण, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. भागीरथी गिरी, उपशिक्षणाधिकारी मारुती जाधव, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले तर आभार अण्णासाहेब घोडके यांनी मानले.

COMMENTS