Homeताज्या बातम्या

कलम 498-अ प्रकरणात पतीसह सासरच्या आठ जणांची निर्दोष मुक्तता

कौटुंबिक छळ, पैशांची मागणी आणि मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बीड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्या

पोटच्या मुलाने केली बापाची हत्याजामखेड तालुक्यातील अरणगाव येथील घटना ; आरोपी ताब्यात
जयभीमनगरात मोठ्या भावाकडून लहान भावाचा दगडाने ठेचून खून
धोंडा खायला बोलावले नाही म्हणून वकील पत्नीस मारहाण; श्रीरामपूर शहर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल



कौटुंबिक छळ, पैशांची मागणी आणि मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बीड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पतीसह सासरच्या आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. शेख इम्रान खाजा यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
फिर्यादी सुमय्या सोहेल शहा हिचा विवाह 31 डिसेंबर 2018 रोजी सोहेल अय्याज शहा याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी कौटुंबिक कर्ज फेडण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करून पती व सासरच्या नातेवाईकांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला, उपाशी ठेवले तसेच घराबाहेर काढल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 296/2023 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 498-अ, 323, 504, 506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. शेख इम्रान खाजा यांनी फिर्यादी व साक्षीदारांची सखोल उलटतपासणी केली. फिर्यादीचे आरोप ढोबळ, संदिग्ध व परस्परविरोधी असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा विचार करून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी फिर्यादी पक्ष आरोपींवरील आरोप शंकातीतपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले. त्यानुसार न्यायालयाने सोहेल अय्याज शहा, अय्याज याकुब शहा, इब्रान अय्याज शहा, रेहाना अय्याज शहा, बुशरा इम्रान शहा, साहेब अय्याज शहा, तौफिक अय्याज शहा आणि शेख नाझिया शेख शाकीर या सर्व आठ आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आय. के. शेख (शेख इम्रान खाजा) यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. अन्वर शेख, अ‍ॅड. सूर्यकांत पवार, अ‍ॅड. पंकज रायभोळे आणि इबाद शेख यांनी सहकार्य केले.

COMMENTS