देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वन महोत्सव सप्ताह

देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वन महोत्सव सप्ताहचा समारोप मंगळवारी (दि. 7) स्वच्छता अभियानाने करण्यात आला. या सप्ताहादरम्यान विविध पर्यावरणपूरक स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यात आले होते.
सप्ताहादरम्यान हरित शपथ, इंडोर प्लांट्स लावणे आणि पर्यावरण जनजागृती रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रांगणात, वर्गखोल्यांमध्ये आणि परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविणार्या विद्यार्थिनींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. अश्विनी बेद्रे यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थिनींच्या उपक्रमांचे कौतुक केले. उपप्राचार्या श्रीमती सय्यद शहाना यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. श्वेता वंजारे यांनी प्रास्ताविकातून सप्ताहभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता लाड हिने केले, तर आभार नयन महालिंगे हिने मानले. या समारोप सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS