ख्यातनाम इतिहास संशोधक आणि येथील यशवंत महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रभाकर देव यांनी आपला बहुमोल वैयक्तिक ग्रंथसंग्रह हा नरह

ख्यातनाम इतिहास संशोधक आणि येथील यशवंत महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रभाकर देव यांनी आपला बहुमोल वैयक्तिक ग्रंथसंग्रह हा नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राला नुकताच देणगीरुपाने भेट दिला. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा.श्यामल पत्की आणि विश्वस्त दीपनाथ पत्की यांनी हा ग्रंथसंग्रह केंद्राच्या वतीने डॉ. देव यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात स्वीकारला. या प्रसंगी प्रा. प्रतिभा देव, डॉ. प्रमोद देव आणि सविता देव उपस्थित होते.
प्राचीन भारत आणि प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास हे डॉ. देव यांच्या संशोधनाचे क्षेत्र होय. या विषयावर त्यांनी विपुल आणि महत्त्वाचे असे लेखन केले आहे. त्याच बरोबर त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाच्या संशोधनात देखील मोलाची भर टाकली आहे. आपल्या अध्यापनाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत डॉ. देव यांनी आग्नेय आशियाचा इतिहास हा विषय कैक दशके विद्यार्थ्यांना शिकवला. त्यामुळे त्यांच्या या संग्रहात त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा यासह या तीनही विषयांवरील दुर्मिळ संदर्भग्रंथ आणि संशोधनपर नियतकालिकांचे अंक आहेत. या संग्रहाच्या सूची करण्याचे काम प्रगतीपथावर असून नजीकच्या भविष्यकाळात ती अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात येईल. डॉ. देव यांच्या या ग्रंथरूपी देणगीमुळे केंद्राचे ग्रंथालय अधिक समृद्ध झाले आहे अशी भावना प्रा.श्यामल पत्की आणि दीपनाथ पत्की यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त तसेच केंद्राचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, आणि प्रतिष्ठानचे इतर विश्वस्त लक्ष्मण संगेवार, डॉ. श्रीनिवास पांडे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. अभय दातार, आणि केंद्राचे संचालक डॉ. यशवंत जोशी या सर्वांनी व्यक्त केली असून याबद्दल डॉ. देव यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS