हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाभर विविध सामाज

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाभर विविध सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवकांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, संघभावना आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजावी या उद्देशाने बीड शहरातील जालना रोड परिसरात एकदिवसीय भव्य इनडोअर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील सहा नामांकित संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि संघभावनेचे दर्शन घडवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दिवसभर रंगलेल्या चुरशीच्या सामन्यांनंतर अंतिम फेरीत बुलंद युनायटेड संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर रॉयल फुटबॉल क्लब संघाने उपविजेतेपद मिळविले. विजेत्या बुलंद युनायटेड संघाला शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या वतीने 11 हजारांचे रोख पारितोषिक, आकर्षक चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उपविजेत्या रॉयल फुटबॉल क्लब संघालाही चषक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळा जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या हस्ते शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विजेता संघ – बुलंद युनायटेड : अरमान खान, सय्यद झैद, सय्यद लबीब, सत्यजित, गौरव, अब्दुल बारी, जीत रॉय. उपविजेता संघ – रॉयल फुटबॉल क्लब : अनस, हसीब, मलिक, अयान, जुमान, आरव, रेहान. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करत युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडेबाबतची आवड वाढण्यास, सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास आणि संघटनात्मक बळकटी मिळण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS