पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मर्यादित उपस
पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मर्यादित उपस्थितीत पार पडणार आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा विचार करून प्रशासनाने सुरक्षेला प्राधान्य देत भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आज बुधवारी 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात पालखी प्रस्थानाचा पारंपरिक सोहळा होणार आहे. मात्र यावेळी सर्वसामान्य भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नसून, केवळ निवडक मानकरी, सेवेकरी, दिंडी प्रतिनिधी आणि निमंत्रित व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार माउलींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 1 ते 25 आणि रथामागील दिंडी क्रमांक 1 ते 20 मधील प्रत्येक दिंडीतून फक्त दहा वारकरी उपस्थित राहू शकतील. याशिवाय संबंधित दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी आणि निमंत्रित प्रतिष्ठित नागरिक यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. या नियोजनानुसार एकूण सुमारे 900 जणांनाच प्रत्यक्ष पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पूरस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे आळंदी परिसरात सतर्कता वाढविण्यात आली असून, वारकरी आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

COMMENTS