भोपाळ : मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात पाच युवकांचा जागीच मृत्यू झा

भोपाळ : मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात पाच युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. भरधाव वेगाने धावणार्या चारचाकी वाहनाने समोरील मालवाहू वाहनाच्या मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. धडक इतकी प्रचंड होती की चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यामधील सर्व प्रवासी वाहनात अडकून पडले.
हा अपघात नादन देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिगरा गावाजवळ सोमवारी रात्री सुमारे दोनच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन मदत पथक, राष्ट्रीय महामार्ग गस्त पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दीर्घकाळ बचाव मोहीम राबवून वाहनात अडकलेल्या सहाही युवकांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यापैकी पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गंभीर जखमी झालेल्या एका युवकाला प्रथम अमरपाटन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सतना येथे हलविण्यात आले. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व युवक एका वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतत होते. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला प्रवास काही क्षणांतच दुर्दैवी ठरला आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. पोलिसांनी मृतांची ओळख अंकुर पटेल (वय 40), मृदुल पटेल (वय 32), विजय पटेल (वय 30), हरीशंकर पटेल (वय 25) आणि शिवा पटेल (वय 23) अशी केली आहे. यापैकी चार युवक मैहर जिल्ह्यातील तनाजा गावचे रहिवासी होते, तर शिवा पटेल हा नरोरा गावचा रहिवासी होता. या अपघातात ओम पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत्यूमुखी पडलेले युवक माजी आमदार दिवंगत लालजीभाई पटेल तसेच काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत मथुरा पटेल यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. अंकुर पटेल हे शेतीबरोबरच व्यवसाय करत होते. मृदुल पटेल धान्य साठवण केंद्राचे संचालन करत होते. विजय पटेल जबलपूर येथे नोकरी करत होते. हरीशंकर पटेल शेती व्यवसायाशी निगडित होते, तर शिवा पटेल नोकरी करत असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS