माहूर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मौजे मेंडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण शाळा परिसरा

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मौजे मेंडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण शाळा परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबके तयार झाले असून त्यातून डास व जंतूंची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे शाळेत येणार्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून तातडीने पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
शाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या प्रयत्नांतून शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांना चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शाळेच्या परिसरातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. माहूर तालुक्यातील अनेक दुर्गम जिल्हा परिषद शाळांची अवस्था चिंताजनक आहे. अनेक शाळांमध्ये गळके स्लॅब, संरक्षण भिंतींचा अभाव, प्रांगणात पेव्हर ब्लॉक नसणे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य अशा समस्या कायम आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शिक्षणावरही परिणाम होत आहे. मौजे मेंडकी गावात जाणारा रस्ताही अत्यंत खराब अवस्थेत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक नियमितपणे शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. मात्र शाळेकडे येणार्या रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि घाण असल्याने विद्यार्थ्यांचे पाय सतत ओले व मळकट राहतात. त्यामुळे खरूज, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा अपुर्या असल्याने ही बाब अधिक गंभीर ठरत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसवावेत, पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवा
डिजिटल शाळेचा आदर्श उभा करणार्या मेंडकी जिल्हा परिषद शाळेत आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाचे साचलेले पाणी, चिखल आणि अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने पेव्हर ब्लॉक व पाणी निचर्याची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

COMMENTS