Homeताज्या बातम्या

भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी

नांदेड : सतत सुरू असलेल्या पावसामुळे भोकर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारासमोरील मुख्य प्रवेशद्वाराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ

मनपा पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक करा, धिंड काढा-कर्मचार्‍यांचा संताप उसळला; खडकपुरा-वाघी रोडवरील घटनेचा तीव्र निषेध; मनपा प्रवेशद्वारासमोर निषेध सभा
आश्रमशाळांच्या शिक्षकांना शाळा संहितेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
संप बेकायदेशीर; कामांवर विनाविलंब रूजू व्हा ; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन


नांदेड : सतत सुरू असलेल्या पावसामुळे भोकर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारासमोरील मुख्य प्रवेशद्वाराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने बसमध्ये चढण्यासाठी व उतरण्यासाठी प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. पाण्याखाली लपलेले खड्डे, सर्वत्र चिखल आणि निसरडा रस्ता यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भोकर बस आगार हे तालुक्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून येथून दररोज हजारो प्रवासी नांदेडसह विविध शहरांकडे प्रवास करतात. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मोठ्या प्रमाणात या बसस्थानकावर अवलंबून आहेत. मात्र बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता पावसाळ्यात कायम जलमय होत असल्याने प्रवास सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांची मोठी कसरत सुरू होते. बस येताच प्रवाशांना पाण्यातूनच धावत जाऊन बस पकडावी लागते. अनेकदा पाण्याखाली असलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने नागरिक तोल जाऊन पडतात. चिखलामुळे कपडे, बूट आणि सामान खराब होत असून महिलांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दिव्यांगांसाठी तर ही परिस्थिती अधिकच बिकट बनली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसस्थानक परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. परिणामी प्रत्येक पावसात हीच समस्या उभी राहत असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. लाखो रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जात असताना सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील बसस्थानक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. प्रवाशांच्या मते, बसस्थानक परिसरातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा, खड्डे बुजविणे आणि सुरक्षित पादचारी मार्गाची उभारणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
’विकासाच्या घोषणा कागदावर; बसस्थानक मात्र जलमय’
भोकर शहरात विकासकामांचे मोठे दावे आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या घोषणा होत असल्या तरी बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात बसस्थानकासमोर पाणी साचण्याची समस्या कायम असतानाही संबंधित विभागांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विकासाच्या दाव्यांवरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
’अपघाताची वाट पाहत आहे का प्रशासन?’
बसस्थानकासमोरील पाण्याखाली खोल खड्डे लपलेले असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांगांना जीव धोक्यात घालून बसमध्ये चढावे लागत आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

COMMENTS