नांदेड शहराची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठासमोर (पुणे) एक धक्कादायक स

नांदेड शहराची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठासमोर (पुणे) एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या जयमाला ढाणकीकर यांनी लवादासमोर दाखल केलेल्या उत्तर शपथपत्रात, नांदेड महानगरपालिकेच्या उदासीनतेवर आणि निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. थेट नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी, पाण्याचा खालावलेला दर्जा आणि जलचर प्राण्यांचा होत असलेला मृत्यू यामुळे गोदावरी नदीचा श्वास गुदमरल्याचे या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्या बातम्यावरून स्पष्ट झाले आहे.
गोदावरीच्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (चझउइ), जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि तक्रारदार यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीवर आधारित अहवाल तयार केला होता. मात्र, महानगरपालिकेने या समितीच्या निष्कर्षांवर आक्षेप घेत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जदारांच्या मते, मनपाचा हा आक्षेप पूर्णपणे फोल असून, स्वतःची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता लपवण्यासाठी तसेच लवादाचा अमूल्य वेळ वाया घालवण्यासाठीच हा खटाटोप केला जात आहे. शपथपत्रातील सर्वात गंभीर आरोप असा आहे की, संयुक्त समितीने केलेल्या जागेच्या पाहणीनंतर लगेचच महानगरपालिकेने जड यंत्रसामग्री तैनात केली. याद्वारे मोठे खड्डे खोदून प्रक्रिया न केलेले मैलापाणी थेट गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. मनपाची ही कृती केवळ पर्यावरणाचा र्हास करणारी नसून, लवादाच्या आदेशांना केराची टोपली दाखवणारी आहे, असे अर्जदाराने म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड शहर आणि परिसरातील अनेक गावांना या प्रदूषित पाण्यामुळे पाणीटंचाई आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकर्यांचे नुकसान: नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये प्रदूषित पाणी मुरल्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत चालली आहे, ज्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. आरोग्याचा धोका: दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नदीत ’जलपर्णी’ आणि घातक वनस्पतींची प्रचंड वाढ झाल्याने पाण्याचा दर्जा कमालीचा खालावला आहे. माशांचा मृत्यू: प्रदूषणाची तीव्रता इतकी भयानक आहे की, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत तरंगतानाचे फोटो पुराव्या दाखल सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणी महानगरपालिकेने मौन बाळगल्याचा आरोप करत, ढाणकीकर यांनी हरित लवादाकडे नदीत प्रदूषक सोडण्यास जबाबदार असणार्या अधिकार्यांवर आणि एजन्सींवर तात्काळ फौजदारी किंवा प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी लवादाने तात्काळ कडक निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

COMMENTS