Homeताज्या बातम्या

किनवट तालुक्यात नियमांची ऐशीतैशी; उघड्यावरील मांस विक्रीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात!’एसी’तील प्रशासनाच्या डोळेझाक धोरणामुळे महामारीची टांगती तलवार; अन्न सुरक्षा कायद्याला हरताळ.

शासकीय कार्यालयांमध्ये एसीच्या गारव्यात बसून केवळ कागदी घोडे नाचवणार्‍या अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला किनवटमधील स

विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित
अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त
सोनईत सुगंधी तंबाखूचा साठा जप्त



शासकीय कार्यालयांमध्ये एसीच्या गारव्यात बसून केवळ कागदी घोडे नाचवणार्‍या अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला किनवटमधील सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ दिसेनासा झाला आहे. किनवट शहरासह गोकुंदा, घोटी, अंबाडी, सारखणी, मांडवी आणि बोधडी या संपूर्ण परिसरातील राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर उघड्यावर मांस आणि मच्छी विक्रीचा विनापरवाना ’गोरखधंदा’ सध्या प्रचंड तेजीत सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तालुक्यात नक्की किती मांस विक्रेते आहेत, याची साधी आकडेवारीही पालिकेच्या ढिम्म खिजगणतीत नाही. प्रशासनाच्या याच अजब आणि संशयास्पद मेहेरबानीमुळे या बेकायदेशीर विक्रेत्यांचे मनोबल कमालीचे वाढले आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे प्रचंड साम्राज्य असून, ही विषारी धूळ थेट रस्त्याकडेला उघड्यावर ठेवलेल्या मांसावर बसत आहे. त्यातच, तासनतास हे मांस उघड्यावर राहत असल्याने त्यावर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ‘बोट फ्लाय’ नावाच्या अत्यंत घातक माश्या त्यावर भणभणत असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या माश्यांमुळे दूषित झालेले मांस घरी नेऊन कितीही स्वच्छ धोवून किंवा शिजवून खाल्ले, तरी त्यातील धोकादायक जिवाणू नष्ट होत नाहीत; परिणामी गंभीर आजार ठरलेलाच असतो. गोकुंदा आणि किनवट शहरात अनेक ठिकाणी राज्यात बंदी असलेल्या बीफची (गोवंश मांस) विक्री होत असून, तिथेही स्वच्छतेचा पुरता तीनतेरा वाजला आहे. या घाणीचा आणि दुर्गंधीचा त्रास केवळ मांसाहारींनाच नाही, तर रस्त्यावरून जाणार्‍या शाकाहारी नागरिकांना, महिला आणि बालकांनाही सहन करावा लागत आहे. नियम आणि परवाना घेऊन प्रामाणिकपणे व अधिकृतपणे व्यवसाय करणार्‍या काही मोजक्या विक्रेत्यांना या बेकायदेशीर बाजारामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. हे विनापरवाना विक्रेते मांस कापल्यानंतर उरलेला रक्तमिश्रित कचरा, हाडे आणि टाकाऊ भाग उघड्यावरच फेकून देतात. खाजगी जागेत दुकान थाटणारेही स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून मोकळे झाले आहेत. या गंभीर प्रकारावर पालिकेचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन ’मुग गिळून’ गप्प का आहे, असा खोचक सवाल आता नागरिक विचारत आहेत. काही संवेदनशील भागात कारवाई करण्याची साधी हिंमतही संबंधित प्रशासन दाखवत नाही. आजवर नियम तोडणार्‍या किती जणांवर दंडात्मक कारवाई केली? याचा कुठलाही हिशोब पालिकेकडे उपलब्ध नाही. अन्नसुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या अनुसूची-4 नुसार किरकोळ चिकन आणि मांस विक्रीच्या दुकानांसाठी कडक नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे, ज्याची किनवटमध्ये सर्रास पायमल्ली होत आहे: दुकान भाजी बाजार आणि कोणत्याही धार्मिक स्थळापासून किमान 50 मीटर लांब असावे. धार्मिक स्थळाजवळ असल्यास दुकानाला काळ्या काचेचे दरवाजे असावेत, जेणेकरून बाहेरील लोकांना आतील मांस दिसणार नाही. दुकानाची उंची 3 मीटर असावी, जमिनीपासून 5 फूट उंचीपर्यंत काँक्रीटची भिंत किंवा फरशी असावी. सांडपाणी वाहून जाण्यासाठी जमिनीला योग्य उतार असावा. टेबल आणि रॅकवर स्टेनलेस स्टील किंवा संगमरवर असावा. पिण्याच्या पाण्याचा सतत पुरवठा आणि योग्य वायुवीजनासाठी एक्झॉस्ट फॅन असणे बंधनकारक आहे,  दुकानात माश्या प्रतिबंधासाठी जाळ्या असाव्यात. मांस 4 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्यासाठी काचेचे फ्रीज असावे. सुरे, अवजारे स्टेनलेस स्टीलचे असावेत आणि ते धुण्यासाठी 82 अंश तापमानापर्यंत गरम पाणी देणारा गिझर असावा. तसेच पायाने उघडणारी कचरापेटी असणे आवश्यक आहे तर दुकानातील प्रत्येक कर्मचार्‍याची अधिकृत वैद्यकीय अधिकार्‍याकडून दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. असे असतांना येथील मांस विक्रेते कुठल्याच शासन नियमांचा पालन करतांना दिसत नाहीत.

COMMENTS