शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ‘धर्म - इस्लाम’ हा पर्याय उपलब्ध नसल्याने तो तातडीने समाविष्ट करण्य

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ‘धर्म – इस्लाम’ हा पर्याय उपलब्ध नसल्याने तो तातडीने समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, अल्पसंख्याक मंत्री तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येणार्या नामावलीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ‘धर्म – इस्लाम’ हा पर्याय उपलब्ध नाही. त्याऐवजी ‘धर्म – मुस्लिम’ आणि ‘जात – मुस्लिम’ असे पर्याय देण्यात आले आहेत. हे चुकीचे असून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी धर्माच्या ठिकाणी ‘इस्लाम’ असा स्पष्ट पर्याय असणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुस्लिम हा समाज असून तो धर्म नसल्याचे सांगत, इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या टीसीवर ‘धर्म – इस्लाम, जात – मुस्लिम’ अशी नोंद असते. मात्र प्रवेश प्रक्रियेतील संगणकीय प्रणालीमध्ये ‘धर्म – इस्लाम’ हा पर्याय नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे युसूफ यांनी म्हटले आहे. प्रवेशासाठी नाव नोंदणी करताना अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांना धर्म आणि जात या दोन्ही ठिकाणी ‘मुस्लिम’ अशी नोंद करावी लागत आहे. भविष्यात शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. एक अल्लाहला मानणार्या प्रत्येक मुस्लिमाचा धर्म हा इस्लाम आहे. धर्म मुस्लिम नसून धर्म हा इस्लाम आहे, असे नमूद करत चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणकीय प्रणालीमध्ये ‘धर्म – इस्लाम’ हा पर्याय समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासकीय व प्रशासकीय स्तरावर मुस्लिम विद्यार्थी किंवा नागरिकांची माहिती घेताना ‘धर्म – इस्लाम’ अशी स्पष्ट नोंद घेण्यात यावी आणि संगणकीय प्रणालीमध्ये हा पर्याय उपलब्ध नसल्यास तो त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत शासकीय तंत्रनिकेतन बीडच्या प्राचार्यांनाही देण्यात आली आहे. निवेदनावर एस.एम. युसूफ यांच्यासह डॉ. संजय तांदळे, डॉ. गणेश ढवळे यांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदन देताना सादिक भाई, अशोक येडे, मुबीन शेख, डी.जी. तांदळे, युनूस शेख, बाजीराव ढाकणे आदी उपस्थित होते.

COMMENTS