Homeताज्या बातम्या

बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

देवळाली प्रवरा : बदलते हवामान आणि अनिश्चित पाऊसमान लक्षात घेऊन शाश्वत, हवामानाधारित आणि खात्रीशीर पीकपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. विद्य

पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात
परिक्रमा पॉलिटेक्निकतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
‘शिंदे’ महाविद्यालयात संत कबीर जयंती उत्साहात  


देवळाली प्रवरा : बदलते हवामान आणि अनिश्चित पाऊसमान लक्षात घेऊन शाश्वत, हवामानाधारित आणि खात्रीशीर पीकपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या वाढदिवसानिमित्त ताहराबाद येथील शेतकऱ्यांनी त्यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करून वाढदिवस साजरा केला. यावेळी ते बोलत होते.  
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पौष्टिक तृणधान्य उत्पादन व मूल्यसाखळी कार्यक्रमांतर्गत बाजरी उत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पिंपळेश्वर महादेव मंदिर, श्रीक्षेत्र ताहराबाद (ता. राहुरी) येथे करण्यात आले होते.
 कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक शेतकऱ्याने बाजरी व नाचणीसारख्या पिकांची लागवड वाढवावी, असे सांगितले. डॉ. पंडित खर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर डॉ. दत्तात्रय पाचरणे यांनी बाजरी उत्पादनाच्या पंचसूत्रीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य वाणाची निवड, बीजप्रक्रिया, वेळेवर पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन, आंतरमशागत आणि पीक संरक्षण या बाबींवर त्यांनी भर दिला.
यावेळी ‘खेत बचाओ अभियान–२०२६’ या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. प्रशांत बोडके, डॉ. पंडित खर्डे, डॉ. दत्तात्रय पाचरणे, डॉ. सुनील अडांगळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. योगेश बन, अशोक हारदे, सरपंच निवृत्ती घनदाट यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि १५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी झावरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. सुनील अडांगळे यांनी केले.

COMMENTS