Homeताज्या बातम्या

आंबीत धरण ओव्हरफ्लो! मुळा नदीला नवसंजीवनी; भंडारदरा धरणातही नव्याने पाण्याची आवक

अकोले: अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील आंबीत धरण रविवारी (दि. २८) सकाळी तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यंदाच्या

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
रुग्णालयात तोडफोड; तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अकोले: अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील आंबीत धरण रविवारी (दि. २८) सकाळी तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरणारे हे जिल्ह्यातील पहिले धरण ठरले आहे. धरण भरल्याने मुळा नदीला नवसंजीवनी मिळाली असून भंडारदरा धरणातही नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे.

घाटमाथ्यासह अकोले तालुक्यात यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली. मात्र शनिवारी रात्री मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे आंबीत धरण अवघ्या काही तासांत भरले. धरणाची एकूण साठवण क्षमता १९३.९७ दशलक्ष घनफूट असून सध्या सांडव्यावरून सुमारे २०० घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग मुळा नदीपात्रात सुरू आहे. हे पाणी पुढे पिंपळगाव खांड धरणाकडे प्रवाहित होत आहे.

मागील वर्षी आंबीत धरण २७ मे रोजीच भरले होते, तर २०२४ मध्ये २८ जून रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा धरण भरण्यास मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे महिनाभराचा विलंब झाला असला, तरी अलीकडील दमदार पावसामुळे धरणाने अखेर पूर्ण क्षमता गाठली आहे.

दरम्यान, मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सुमारे ११ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस असाच कायम राहिल्यास धरणसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS