श्रीगोंदा: घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याबाबत लोकमंथनने ९ जून २०२६ रोजी प्रमुख वृत


श्रीगोंदा: घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याबाबत लोकमंथनने ९ जून २०२६ रोजी प्रमुख वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत संबंधित शेतकऱ्यांनी विहिरीभोवती संरक्षणात्मक कठडे बांधल्याने नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.
या उघड्या विहिरीमुळे रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विहिरीच्या अगदी लगत रस्ता असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात होती. लोकमंथनने हा लोकहिताचा विषय सातत्याने मांडत प्रशासन व संबंधितांकडे उपाययोजनेची आग्रही मागणी केली होती.
वृत्ताच्या परिणामी, संबंधित शेतकऱ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत विहिरीभोवती मजबूत काँक्रीटचे संरक्षण कठडे उभारले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून संभाव्य अपघातांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
परिसरातील नागरिकांनी जागरूकतेबद्दल संबंधित शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच लोकहिताच्या प्रश्नांवर वृत्तपत्रांनी केलेल्या अशाच प्रभावी पाठपुराव्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीगोंदा तालुक्यातील इतरही धोकादायक ठिकाणांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

COMMENTS