कोपरगाव शहर: कोपरगाव तालुक्यातील वारी येथील वैभव आण्णासाहेब टेके नावाचा २३ वर्षीय तरुण पुण्यातील वाघोली परिसरातून अचानक बेपत्ता झाला आहे. त्याच्य

कोपरगाव शहर: कोपरगाव तालुक्यातील वारी येथील वैभव आण्णासाहेब टेके नावाचा २३ वर्षीय तरुण पुण्यातील वाघोली परिसरातून अचानक बेपत्ता झाला आहे. त्याच्या बेपत्ता होण्याबाबत वाघोली पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता वैभव टेके आणि त्याची बहीण दोघेही नोकरीनिमित्त पुण्यात एकत्र राहत होते. सोमवार, २२ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास वैभव कोणालाही काहीही न सांगता अचानक रूममधून निघून गेला. त्याची बहीण सायंकाळी कामावरून घरी आली असता, वैभव रूममध्ये नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने याविषयी त्वरित आपल्या वडिलांना फोन करून माहिती दिली.
यानंतर वडिलांनी तातडीने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांकडे वैभवबाबत चौकशी केली; मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास उपपोलीस निरीक्षक सुवर्ण इंगळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सदर बेपत्ता तरुण कोणालाही आढळल्यास किंवा त्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन त्याचे वडील आण्णासाहेब टेके व परसराम टेके यांनी केले आहे.

COMMENTS