मुंबई: राज्यात रविवारी (२८ जून) होणारी शिक्षक पात्रता चाचणी (TET) परीक्षा भिवंडीतून फुटल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने अधिकृत निवेदन काढून

मुंबई: राज्यात रविवारी (२८ जून) होणारी शिक्षक पात्रता चाचणी (TET) परीक्षा भिवंडीतून फुटल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने अधिकृत निवेदन काढून ही परीक्षा रद्द केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी शनिवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. याप्रकरणी पोलिसांनी कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत लावलेल्या सापळ्यात आणि त्यानंतर सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी संदर्भात संशयित थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल होण्यापूर्वीच संशयित तेथून फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून सहारा एअरपोर्ट परिसरातून या तिघांना ताब्यात घेतले.
प्रश्नपत्रिकेशी जुळले जप्त केलेले प्रश्न
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आले. यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडीत आणले असून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे परिसरात प्रश्नपत्रिकांची पैशांच्या मोबदल्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती २७ जूनच्या पहाटे पोलिसांना मिळाली होती. जप्त केलेल्या प्रश्नांची परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक पडताळणी केली असता, अधिकृत प्रश्नपत्रिकेशी त्यांचे साधर्म्य आढळून आले. प्रश्नपत्रिका नेमकी कशी बाहेर आली आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
४ लाख २८ हजार उमेदवारांना फटका; २-३ दिवसांत नवी तारीख
यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये सर्वाधिक ४५ हजार उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यातील १,०२८ केंद्रांवर परीक्षेची तयारी पूर्ण झाली असताना हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी उमेदवारांना दिलासा दिला असून, परीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले आहे. पुढील २ ते ३ दिवसांत परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS