Homeताज्या बातम्या

नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा ’सिंघम’च्या हाती; गुन्हेगारांबरोबरच राजकीय दबावालाही द्यावी लागणार टक्कर!

नांदेड: जिल्ह्याच्या पोलीस दलाला अखेर कठोर निर्णयक्षमता आणि धडक कारवायांसाठी ओळखला जाणारा अधिकारी लाभला आहे. २०१६ बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. नीलभ र

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
ज्या शाळेने घडविले, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार; १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप
ठाणे जमीन गैरव्यवहार

नांदेड: जिल्ह्याच्या पोलीस दलाला अखेर कठोर निर्णयक्षमता आणि धडक कारवायांसाठी ओळखला जाणारा अधिकारी लाभला आहे. २०१६ बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. नीलभ रोहन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारताच प्रशासनात नव्या अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नांदेडची जबाबदारी ही केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून, गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप आणि संघटित अवैध व्यवसायांना तोंड देण्याची मोठी परीक्षा त्यांच्यासमोर उभी आहे.

उत्तर प्रदेशचे मूळ रहिवासी असलेले डॉ. नीलभ रोहन यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली, तर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून अवघ्या सहा महिन्यांत गुन्हेगारांवर अभूतपूर्व कारवाया करून राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली. एकाचवेळी ५० हून अधिक अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई, गुटखा, अवैध दारू आणि वाळू माफियांविरोधातील धडक मोहिमा यामुळे त्यांची प्रतिमा ’ॲक्शन ऑफिसर’ अशी बनली. आता त्यांच्यासमोर नांदेडसारखा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि वेगाने वाढणारा जिल्हा आहे.

गेल्या काही वर्षांत वाढलेली गुन्हेगारी, चोरी, टोळीगिरी, मोबाईल हिसकावण्याच्या घटना आणि संघटित गुन्हेगारी यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाई करणे ही काळाची गरज आहे. नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थाही आज गंभीर समस्येच्या टप्प्यावर पोहोचली आहे. प्रमुख चौकांतील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमण आणि अपुर्‍या पार्किंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन, कडक अंमलबजावणी आणि वाहतूक शाखेचे सक्षम नियोजन या माध्यमातून शहराला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस अधीक्षकांसमोर असेल.

शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर निर्णायक कारवाई करणे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणे, हीदेखील महत्त्वाची जबाबदारी असेल. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा हा केवळ महसुलाचा प्रश्न नसून कायदा-सुव्यवस्थेचाही विषय बनला आहे. वाळू माफियांचे जाळे आणि त्यामागील आर्थिक हितसंबंध मोडून काढण्यासाठी महसूल विभागासह संयुक्त कारवाई करावी लागणार आहे. हिंगोलीत दाखविलेल्या धाडसाची पुनरावृत्ती नांदेडमध्येही होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नांदेडचे राजकारण नेहमीच बहुरंगी राहिले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रभावी नेते, स्थानिक राजकीय समीकरणे आणि विविध स्तरांवरील दबाव यामध्येही पोलीस दलाची निष्पक्षता कायम राखणे ही सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही राजकीय दबाव स्वीकारला जाणार नाही, असा संदेश कृतीतून देण्यातच त्यांच्या नेतृत्वाचे यश दडलेले असेल. डॉ. नीलभ रोहन यांच्या नियुक्तीमुळे नांदेडकरांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत. मात्र, या अपेक्षांची पूर्तता केवळ धडक कारवायांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलीसिंगनेच होणार आहे. आता ’सिंघम’ची प्रतिमा प्रत्यक्ष कामगिरीत कितपत उतरते आणि नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेला नवे बळ मिळते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS