बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एमपीडीए (M


बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत वडवणी आणि केज येथील दोन सराईत गुंडांना हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील गुन्हेगारी, वाळू माफिया आणि इतर बेकायदेशीर कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत वडवणी येथील साहील सूर्यकांत भोरे (वय २१) आणि केज येथील उमेर ऊर्फ पापा मुस्ताक फारोकी (वय ३०) यांना ताब्यात घेऊन हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले.
साहील भोरे याच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अवैध शस्त्र बाळगणे तसेच गंभीर दुखापत करण्यासह एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने त्याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. तर उमेर ऊर्फ पापा फारोकी याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात मारहाण, चोरी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे दहा गंभीर गुन्हे नोंद आहेत. वारंवार कारवाई करूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त न झाल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अनुक्रमे २२ व २३ जून रोजी स्थानबद्धतेचे आदेश पारित केले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन २४ जून रोजी हर्सूल कारागृहात दाखल केले. जिल्ह्यातील वाळू माफिया, अवैध गुटखा विक्रेते, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे तसेच जातीय सलोखा बिघडविणार्या समाजकंटकांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सहकार्याने पार पडली.

COMMENTS