नागपूर: नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे एका सामाजिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. राष

नागपूर: नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे एका सामाजिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मात्र त्यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केले आहे.
नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्वयंसेवकांमधील शिस्तीचे कौतुक केले आणि संघाची स्थापना करणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. समाजजीवनात संघटित कार्य आणि शिस्त यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या वक्तव्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देत, सरकारी अधिकाऱ्यांनी संविधानिक जबाबदाऱ्यांचे भान राखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही विशिष्ट विचारसरणीशी सार्वजनिकरीत्या जवळीक दाखवू नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संविधानाची शपथ घेतलेल्या अधिकाऱ्यांनी सर्व समाजघटकांबाबत समान व तटस्थ भूमिका राखणे अपेक्षित आहे; अन्यथा लोकशाही मूल्यांवर परिणाम होऊ शकतो, असा दावा पक्षाने केला आहे. नांगरे पाटील यांच्या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
मंत्री बावनकुळेंकडून स्वागत
काँग्रेसने नांगरे पाटील यांच्या नियुक्तीवर आणि कृतीवर आक्षेप घेतला असताना, राज्याचे नेते आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे नागपुरात स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “श्री. विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो व आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.”

COMMENTS