Homeताज्या बातम्या

घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप

केज: टाकळी (ता. केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या संवेदनशील गुन्ह्यातून पीडित कुटुंबाला न्याय

सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026
शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन

केज: टाकळी (ता. केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या संवेदनशील गुन्ह्यातून पीडित कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक असतानाच, राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझा मुलगा सौरवचे नाव यात जाणीवपूर्वक ओढले जात आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी, आमचे सीडीआर काढावेत, आम्ही तपासाला सहकार्य करू, अशी भूमिका खा. बजरंग सोनवणे यांनी मांडली.

माध्यमांशी संवाद साधताना खा. सोनवणे म्हणाले, टाकळी येथील घटनेशी आमचा दूरवरचाही संबंध नाही. माझी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. या चौकशीअंती किंवा या गुन्हेगारी कटात माझा मुलगा अथवा मी स्वतः कुठेही दोषी आढळलो, तर आमच्यावर कायद्यानुसार जी कठोर कारवाई करायची आहे ती प्रशासनाने निःसंकोचपणे करावी. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत.

दरम्यान, या वादाला राजकीय रंग देऊन जिल्ह्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांचा प्रयत्न केला जात आहे. जर उच्चस्तरीय चौकशीमध्ये आमचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले, तर मग केवळ राजकीय आकसापोटी आमच्यावर बेछूट आरोप करणाऱ्यांवर आणि आपल्या प्रक्षोभक वक्तव्यातून बीड जिल्ह्यात अराजकता माजवू पाहणाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेत जे आरोपी असतील त्यांना तातडीने अटक करावी आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील खा. सोनवणे यांनी केली आहे.

COMMENTS