नांदेड : विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासह रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विशेष तिकीट तपा

नांदेड : विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासह रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. १९ जून २०२६ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ८ या कालावधीत पार पडलेल्या या मोहिमेत एकूण ५४३ प्रकरणे निष्पन्न झाली असून त्यातून तब्बल ३ लाख ८० हजार ५५० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला.
२६ रेल्वेगाड्यांमध्ये सखोल तपासणी
या विशेष मोहिमेचे नियोजन व देखरेख सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विभागातील विविध पथकांतील २७ तिकीट तपासणी कर्मचार्यांनी या व्यापक कारवाईत सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान नांदेड विभागातून धावणार्या २६ रेल्वेगाड्यांमध्ये सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी, चुकीच्या किंवा अपूर्ण तिकिटांवर प्रवास करणारे प्रवासी तसेच बुकिंग न करता सामान वाहतूक करणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५४३ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, त्यांच्याकडून भाडे, दंड आणि इतर शुल्काच्या स्वरूपात ३.८१ लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली.
वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन
रेल्वे प्रशासनाच्या मते, अशा विशेष मोहिमांमुळे प्रवाशांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण होते. तसेच प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणार्या प्रवाशांना न्याय मिळण्यास मदत होते. प्राप्त झालेला महसूल हा रेल्वेच्या उत्पन्नाचे संरक्षण आणि प्रवास नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या नांदेड विभागाच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांना वैध तिकीट अथवा अधिकृत प्रवास परवानगी घेऊनच प्रवास करण्याचे तसेच सामानाची नियमानुसार बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातही विनातिकीट व अनियमित प्रवासाविरोधात अशा विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. सुरक्षित, आरामदायी आणि नियमबद्ध प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे कटिबद्ध असून रेल्वे नियमांचे पालन करण्यासाठी सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क विभाग, नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS