मुंबई : फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे अचूक मोजमाप करून त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यातील प्रत्येक गावात हव

मुंबई : फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे अचूक मोजमाप करून त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राज्यातील प्रत्येक गावात हवामान केंद्र (वेदर स्टेशन) उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील हवामानाधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळणे आणि प्रलंबित तक्रारी याबाबत आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. कृषिमंत्री म्हणाले की, गावांमध्ये हवामान केंद्रे उभारल्यामुळे नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान आणि विम्याचे निकष यांच्यात अचूक तुलना करणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल आणि त्यांना वेळेत योग्य भरपाई मिळेल.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपन्या, बँका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय वाढवण्याचे आणि प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. कोणताही पात्र शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. गाव पातळीवरील या हवामान केंद्रांमुळे केवळ विमा दाव्यांच्या प्रक्रियेतच नव्हे, तर शेतीचे उत्तम नियोजन करण्यातही शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

COMMENTS