चंद्रभागा पोदार लर्न स्कूल, दिंद्रुड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श

चंद्रभागा पोदार लर्न स्कूल, दिंद्रुड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या मैदानावर शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध योगासनांचा सराव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. अतुल ठोंबरे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. प्रत्येकाने योगाचा स्वीकार करून त्याचे महत्त्व जपले पाहिजे. यावेळी शाळेचे प्राचार्य मा. श्री. निलेश निंदाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाच्या शैक्षणिक फायद्यांवर प्रकाश टाकला. नियमित योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसून येतो, असे त्यांनी सांगितले. शाळेचे समन्वयक मा. श्री. राजेंद्र पांडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे आवाहन केले. दिवसाची सुरुवात केवळ 10 मिनिटांच्या योगाने करा. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत राहते आणि अभ्यासातही लक्ष केंद्रित करता येते. योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो जीवनशैलीचा भाग असावा, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना दररोज सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला. योग सत्रामध्ये सूर्यनमस्कार, विविध प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करण्यात आला. या उपक्रमात समन्वयक मा. श्री. अमोल दळवे, शिक्षक मा. श्री. बाळू घुगे आणि मा. श्री. उत्तरेश्वर मायकर यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत योगासने करून घेतली व योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणीबाबत जनजागृती निर्माण झाली.

COMMENTS