Homeताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक: नांदेडच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा निकाल’मविआ’ विरुद्ध ’महायुती’च्या लढतीचे जिल्ह्यात उमटणार तीव्र पडसाद!

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे 99.78 टक्के मतदान पार पडल्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गणितांना वेग आला

अहंकारी लोकप्रतिनिधींना मतदारांनी जागा दाखवावी
वाई बाजार येथे रामनवमी निमित्य खा.हेमंत पाटील यांचे आगमन
नांदेड मनपा क्षेत्रात जनगणनेच्या कामात सावळागोंधळसाहित्याअभावी प्रगणक हवालदिल, तर प तांत्रिक अडचणींच्या गर्तेत!


नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे 99.78 टक्के मतदान पार पडल्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गणितांना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपल्याकडे 270 मतांचे पारडे जड असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे महायुतीचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी ’300 पार’चा नारा देत अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या अटीतटीच्या लढतीचे निकाल केवळ या जागेपुरते मर्यादित न राहता, नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण राजकीय भविष्यावर आणि स्थानिक समीकरणांवर याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
 माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणांच्या राजकीय वर्चस्वाची कसोटी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक आहे. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर विजयी झाल्यास, जिल्ह्यावरील चव्हाणांची पकड पूर्वीसारखीच मजबूत असल्याचे सिद्ध होईल. मात्र, निकाल उलट लागल्यास भाजपमधील त्यांच्या वर्चस्वाला आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील त्यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान मिळू शकते.    कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या रूपाने महाविकास आघाडीने तरुण चेहर्‍याला संधी दिली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर ’ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे राजकीय भूकंप झाला असला, तरी मविआने एकसंध राहण्याचा प्रयत्न केला आहे. आष्टीकर यांचा विजय झाल्यास जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमालीचे वाढेल आणि चव्हाणांशिवायही मविआ जिल्ह्यात मोठी ताकद उभी करू शकते, हा संदेश जाईल. या निवडणुकीत ’ऑपरेशन टायगर’ अंतर्गत झालेल्या अंतर्गत घडामोडी आणि अपक्षांची भूमिका यामुळे जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेत्यांचे अंतर्गत हेवेदावे समोर आले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील पक्षीय निष्ठा बदलू शकतात, ज्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये नव्या आघाड्या किंवा अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. इंजि. प्रशांत इंगोले यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन निश्चित मानले जात आहे. वंचितला मिळणारी मते कोणाचे नुकसान करतात, यावर भविष्यातील दलित-बहुजन मतपेढीचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल, याचे गणित ठरणार आहे. या विधान परिषद निवडणुकीचा निकाल नांदेड जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुकांची नांदी ठरणार आहे. विजयाचा गुलाल ज्याच्या कपाळावर लागेल, त्याचेच आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व राहील, असे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे.

COMMENTS