सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकर्यांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने व्यापक तयारी क
सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकर्यांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने व्यापक तयारी केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातून तब्बल 5 हजार 500 विशेष बसगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकर्यांनाही थेट पंढरपूर गाठणे अधिक सोपे होणार आहे. विशेष बससेवांमध्ये शासनाच्या विविध प्रवासी सवलती लागू राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. तसेच ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या बस आगाराशी संपर्क साधून विशेष बससेवेची नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे. गेल्या वर्षी आषाढी यात्रेदरम्यान 5 हजार 200 बसगाड्यांच्या माध्यमातून सुमारे 21 लाख 95 हजार भाविकांची सुरक्षित ने-आण करण्यात आली होती. यंदा वाढीव गर्दीचा विचार करून विशेष बसांची संख्या वाढविण्यात आली आहे. वारी काळात दिवसरात्र सेवा बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी अशा सुमारे 13 हजार कर्मचार्यांसाठी विशेष भोजन, नाश्ता आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेतील सेवाभावी कर्मचार्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 36 हून अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा कर्मचारी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने वाहतूक व्यवस्थापनाचे काम सांभाळणार आहेत.
पंढरपुरात चार तात्पुरती बस स्थानके
भाविकांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी पंढरपूर येथे चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे महाविद्यालय परिसर) या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय सुविधा, आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष तसेच मार्गदर्शक फलकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
वारकर्यांच्या सेवेत अहोरात्र यंत्रणा
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. या यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या सेवेसाठी राज्य परिवहनची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहणार असून, वारकर्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सोयीस्कर करण्यासाठी सर्व स्तरांवर तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS