बीड : शहरातील गांधीनगर परिसरात झाडू बनवण्याच्या व्यवसायाच्या आडून गांजाची विक्री करून तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणार्या एका 70 वर्षीय वृद्ध म

बीड : शहरातील गांधीनगर परिसरात झाडू बनवण्याच्या व्यवसायाच्या आडून गांजाची विक्री करून तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणार्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला पेठ बीड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 6 किलो 74 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 36 हजार 444 रुपये आहे. या कारवाईमुळे गांधीनगर परिसरासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कमलबाई राधाकिसन खंडागळे (वय 70, रा. गांधीनगर, बीड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, झाडू बनवण्याच्या व्यवसायाच्या आडून ती अनेक दिवसांपासून गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माध्यमातून परिसरातील युवकांना अमली पदार्थांची सवय लावली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पेठ बीड पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक निलेश केळे यांना 16 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत या अवैध व्यवसायाची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईची योजना आखली. अत्यंत गोपनीयतेने पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आणि गांधीनगर येथील संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी घराची कसून झडती घेतली असता झाडू बनवण्यासाठी ठेवलेल्या शिंदळीच्या ढिगार्याखाली गांजाचा मोठा साठा लपवून ठेवलेला आढळून आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 6.074 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 36 हजार 444 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर महिला पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने आरोपी कमलबाई खंडागळे यांना ताब्यात घेण्यात आले. शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 194/2026 अन्वये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस अॅक्ट) कलम 8 (क), 20 (ब) (ळळ) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे करत आहेत. दरम्यान, शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, युवकांना नशेच्या विळख्यात अडकविणार्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पेठ बीड पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, गांजा विक्रीच्या साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

COMMENTS