बीड : अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, 22 जूनपासून सुरू होणार्या

बीड : अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, 22 जूनपासून सुरू होणार्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर मशाल घेऊन जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे समितीने सांगितले आहे.
समितीच्या वतीने राबविण्यात येणार्या या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यासह धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जामखेड, लातूर, बुलढाणा, पालघर, परभणी, मुंबई आणि भिवंडी या भागांचा दौरा पूर्ण करण्यात आला आहे. या दौर्यादरम्यान विविध सामाजिक संघटना, नागरिक, युवक आणि समाजातील विविध घटकांशी संवाद साधून कायद्याच्या गरजेबाबत जनजागृती करण्यात आली. सर्वत्र नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा समितीने केला आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला न्याय, सुरक्षा आणि घटनात्मक हक्कांचे प्रभावी संरक्षण मिळावे, यासाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. यासह विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांबाबतही शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समितीच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. ही लढाई पूर्णपणे लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने सुरू राहणार असल्याचे समितीने सांगितले आहे. मुंबईतील 22 जूनच्या आंदोलनानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही जनजागृती दौरा आयोजित करण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानावर होणार्या उपोषण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनावर लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करावा, असे आवाहन अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समितीच्या या आंदोलनाकडे राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS