Homeताज्या बातम्या

कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 7 गोवंशीय जनावरे मुक्त; एकावर गुन्हा दाखल

बीड प्राणी संवर्धन व पशुसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कारवाईत पेठ बीड पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे डांबून ठेवलेल्या सात

पवनचक्कीवर दरोडा टाकणार्‍या अट्टल टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद
’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक


बीड प्राणी संवर्धन व पशुसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कारवाईत पेठ बीड पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे डांबून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 16 जून) दुपारी सुमारे 12 वाजता ’डायल 112’ या आपत्कालीन सेवा क्रमांकावर पेठ बीड पोलिसांना एक महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. शहरातील कुरेशी फंक्शन हॉलसमोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे चारा-पाण्याविना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत डांबून ठेवण्यात आली असून त्यांची कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी तत्काळ हालचाली सुरू करत संबंधित पथकाला घटनास्थळी पाठविले. प्रथमदर्शनी माहितीची खातरजमा करण्यात आली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच पोलीस उपनिरीक्षक साईनाथ बारगळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाड टाकली. छाप्यामध्ये पोलिसांना एका पत्र्याच्या शेडमध्ये सात गोवंशीय जनावरे अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आली. जनावरांना ना पुरेसा चारा होता, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. जनावरांना कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. या जनावरांची अंदाजे किंमत 86 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अंमलदार दिनकर मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुज्जु इक्बाल कुरेशी याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 193/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 3 व 11 तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 च्या कलम 5 व 9 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जनावरांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधला असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच परिसरातील इतर ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार सुरू आहेत का याबाबतही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, गोवंशीय जनावरांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. प्राणी कल्याण आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश या कारवाईतून गेला आहे. ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ बारगळ, सहाय्यक फौजदार खेत्रे, पोलीस हवालदार विलास ठोंबरे, चांदणे, पोलीस अंमलदार दिनकर मुंढे आणि गणेश सानप यांनी सक्रिय सहभाग घेतला. गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS