नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोली


नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ’ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (LCB), नांदेड ग्रामीण, लिंबगाव आणि सोनखेड पोलीस ठाण्यांनी मंगळवारी (दि. १६ जून २०२६) गोदावरी नदी पात्रात संयुक्त वादळी कारवाई केली. या छाप्यात वाळू उपसा करणारी १२ इंजिने, ११ बोटी, २३७ तराफे आणि ३२ ब्रास वाळू असा एकूण ३ कोटी २१ लाख १० हजार रुपयांचा अवाढव्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, १६ जून रोजी कल्लाळ, भनगी, पिंपळगाव, मार्कंड आणि गंगाबेट परिसरातील गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी एलसीबी, नांदेड ग्रामीण, सोनखेड आणि लिंबगाव पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदारांची विशेष पथके तयार करून एकाच वेळी छापा टाकण्यासाठी रवाना केली. पोलीस पथकांनी नदी पात्रात धाड टाकताच वाळू माफिया आणि मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांना पाहताच आरोपींनी नदी पात्रातून पळ काढला.
या प्रकरणी प्रसाद कळके, सचिन कळके (दोघे रा. कल्लाळ), हॅपी सिलेदार, अमित हंबर्डे, अरुण लुटे (सर्व रा. विष्णुपूरी, नांदेड), पवन येवले, मोहन येवले (रा. मार्कंड), रमेश गच्चे, रघुनाथ मोरे, पवन मोरे, भागवत मोरे (सर्व रा. भनगी), विकास डक (रा. पिंपळगाव), मनोज क्षीरसागर (रा. बोरगाव), विवेक राजू सोनटक्के (रा. गंगाबेट), मोतीराम सोनटक्के आणि पुंडलिक सोनटक्के (दोघे रा. वाहेगाव) अशा १६ जणांविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सह कलम ४, २१ गौण खनिज उत्खनन अधिनियम १९५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
बोटी आणि इंजिने जिलेटीनने उडवली; २३७ तराफे केले भस्मसात
या धडक कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:
- ११ बोटी: किंमत १ कोटी ६५ लाख रुपये
- २३७ तराफे: किंमत १ कोटी १८ लाख ५० हजार रुपये
- १२ इंजिने (रेती काढण्याचे): किंमत ३६ लाख रुपये
- ३२ ब्रास रेती: किंमत १ लाख ६० हजार रुपये
या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या ११ बोटी आणि १२ इंजिने अत्यंत वजनदार असल्याने आणि ती पाण्याच्या बाहेर काढणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने, पोलिसांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलत ती जिलेटीनच्या सहाय्याने जागेवरच उडवून नष्ट केली. तसेच वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे २३७ तराफे जाळून भस्मसात करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पथकांचे कौतुक
सदरची धडक आणि यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये एलसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, बोधनकर, तसेच एलसीबीचे सपोनि रवी वाहुळे, सपोनि घोगरे, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, महेश कोरे आणि अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS