Homeताज्या बातम्या

अन्न व भेसळ कायदा धाब्यावर बसविणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले! भोकर तालुक्यात भेसळखोरांमध्ये घबराट

भोकर : भोकर तालुक्यासह शहरातील अनेक दुकानदारांकडून अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंधक कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. अ

मंत्री झिरवाळ प्रकरणात आरोपीची;गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी! FDA च्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत जप्त केलेला ट्रक पळवला; वाळूज पोलिसांकडून दोन मुख्य आरोपींना अटक
नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा

भोकर : भोकर तालुक्यासह शहरातील अनेक दुकानदारांकडून अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंधक कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी भेसळयुक्त व संशयित माल लपवून ठेवल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बेधडक, पारदर्शक, निःस्वार्थ आणि दबावमुक्त कार्यपद्धतीमुळे भेसळखोर व्यापाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. संभाव्य तपासणी व कारवाईच्या भीतीने अनेक ठिकाणी संशयित मालाची हालचाल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भेसळयुक्त खाद्यतेल, तेलाच्या टाक्या, खुला तंबाखू, मुदत संपलेले (एक्सपायरी डेट नसलेले) खाद्यपदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पनीर, चिवडा, बिस्किटे, चॉकलेट्स आणि निकृष्ट तेलात बनवलेले घरगुती खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.

शहरातील अनेक गोळी-बिस्कीट भंडारातून उत्पादित व एक्सपायरी तारीख नसलेल्या वस्तू होलसेल दरात ग्रामीण भागातील किरकोळ दुकानदारांना विक्री केल्या जात आहेत. तसेच गोळी-बिस्कीटच्या नावाखाली दुकाने चालवून त्याआड सर्रासपणे गुटखा विक्री चालू असल्याचीही चर्चा सध्या शहरासह ग्रामीण भागात आहे. त्यामुळे अशा दुकानांची झाडाझडती घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अवैध साठ्यात विविध प्रकारच्या गुटखा-पुड्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी अन्नपदार्थांची साठवणूकही नियमबाह्य पद्धतीने केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

केवळ नफेखोरीच्या हव्यासापोटी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करता व्यवसाय करणाऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य तपासणी व कारवाईपासून बचाव करण्यासाठी विविध क्लृप्त्यांवर चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच भोकर तालुक्यातील अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची विशेष तपासणी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

COMMENTS