Homeताज्या बातम्या

नेकनूर प्रकरणात आमदार संग्राम जगताप व आमदार महेश लांडगे यांच्यावर कारवाईची मागणी; ॲड. शेख शफीक भाऊंचे पोलिसांना चौथे निवेदन

नेकनूर : एआयएमआयएम (AIMIM) चे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी सोमवारी नेकनूर येथे भेट देत संघटनात्मक बांधणी, सामाजिक उपक्रम आणि प्रलंबित

परळीत एलसीबीचा धडाकेबाज छापा; २६ किलो गांजासह ७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन इंगळे यांच्या बदलीची मागणी; अवैध धंद्यांना संरक्षणाचा नागरिकांचा आरोप
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका; माजलगावात दोन आरोपींना अटक

नेकनूर : एआयएमआयएम (AIMIM) चे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी सोमवारी नेकनूर येथे भेट देत संघटनात्मक बांधणी, सामाजिक उपक्रम आणि प्रलंबित तक्रारींच्या पाठपुराव्याचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष अन्वर हाशमी, नेकनूरचे सामाजिक कार्यकर्ते अमजद पाशा, नवनियुक्त प्रभारी शहराध्यक्ष शेख वसीम भाई, तसेच शकील कारभारी, नसीर कारभारी, अब्दुल रहमान (राजू), शेख जुनेद, शेख आमिर, बशीर तांबोळी, शेख वाजेद यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.

हाशमी फार्म हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात नव्याने नियुक्त करण्यात आलेले प्रभारी शहराध्यक्ष शेख वसीम भाई यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शहर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नेकनूरमध्ये एआयएमआयएमच्या वतीने सुरू असलेल्या ‘सर्वांसाठी मोफत पाणी टँकर’ उपक्रमाचा गौरव करण्यात आला. पाणीटंचाईच्या काळात सर्व समाजातील नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करून देणाऱ्या शेख जुनेद, शेख आमिर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले.

दरम्यान, ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नेकनूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण व धार्मिक भावना भडकावणाऱ्या भाषणांबाबत यापूर्वी दिलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला. शिष्टमंडळाने सांगितले की, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या भाषणासंदर्भात १९ मे २०२६ रोजी लेखी तक्रार, निवेदन व व्हिडिओ पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले होते. तसेच पेन ड्राईव्हसह आवश्यक कागदपत्रेही देण्यात आली होती. मात्र अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली नसल्याने पोलीस प्रशासनाला चौथ्यांदा निवेदन देण्यात आले.

या निवेदनातून तक्रारीवर झालेली कार्यवाही, गुन्हा दाखल झाला आहे का, झाल्यास एफआयआर (FIR) क्रमांक व लागू करण्यात आलेली कलमे तसेच तपासाची सद्यस्थिती याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. नव्या नेतृत्वाचा सत्कार, सामाजिक उपक्रमांचा गौरव आणि तक्रारीच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम जिल्हाध्यक्षांचा नेकनूर दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

COMMENTS