विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा - प्राचार्य यशवंत भोसले वडवणी : "आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात क

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा – प्राचार्य यशवंत भोसले
वडवणी : “आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा स्वीकार करावा. गरिबी किंवा न्यूनगंड मनातून काढून टाकून ध्येयाने वाटचाल करावी,” असे परखड मत डॉ. सोनाजीराव रांजवन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य यशवंत भोसले यांनी व्यक्त केले.
नालंदा फाउंडेशन (बीड) यांच्या वतीने वडवणी येथील हिंगलाज माता मंदिर परिसरात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या शोभाताई आंधळे, प्रा. ओमप्रकाश जाधव, प्रा. अर्जुन राठोड, प्राचार्य भारत मगर, प्रा. विजयकुमार बोचरे, प्राचार्य संतोष मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्या शोभाताई आंधळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, यशासाठी जिद्दीसोबतच योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप रोडे यांनी, बीड जिल्ह्याची ओळख कर्तृत्व आणि गुणवत्तेने निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवून कष्ट करावेत, असे आवाहन केले. या सोहळ्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रेरणादायी पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डी. डी. राऊत व प्राचार्य प्रकाश ढोकणे यांनी केले असून तुलसी समूहाच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS