बीड : ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर, सामाजिक व प्रशासकीय अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तहसील कार्यालय यांच्य

बीड : ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर, सामाजिक व प्रशासकीय अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून २०२६ रोजी बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, अण्णा वंजारे, पीएलव्ही अशोक तांगडे आणि तत्त्वशील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. वहाब ए. सय्यद यांनी सांगितले की, ‘नालसा’च्या (NALSA) ज्येष्ठ नागरिक कायदेशीर सेवा योजना-२०१६ अंतर्गत वयोवृद्धांना कायदेशीर मदत, महसूल विषयक मार्गदर्शन व शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच त्यांनी वाढत्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहावे, कोणालाही बँक माहिती किंवा ओटीपी (OTP) शेअर करू नये, असे आवाहन केले.
या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. स्वप्ना घोळवे आणि डॉ. भिसे यांनी उपस्थित वृद्धांची आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला. अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी ज्येष्ठ नागरिकांचे मूलभूत हक्क अबाधित राखण्यासाठी प्रशासन व प्राधिकरण सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जाधवर यांनी केले तर आभार अण्णा वंजारे यांनी मानले. या उपक्रमाचे बीड शहरातील ज्येष्ठ नागरिकांमधून मोठे स्वागत होत आहे.

COMMENTS