नांदेड : राज्यात १५ जूनपासून सुरू झालेल्या ‘स्विफ्ट चार्ट’वरील स्मार्ट उपस्थिती प्रणालीमुळे अकरावी-बारावी विज्ञान शाखेच्या डमी महाविद्यालयांचे धा

नांदेड : राज्यात १५ जूनपासून सुरू झालेल्या ‘स्विफ्ट चार्ट’वरील स्मार्ट उपस्थिती प्रणालीमुळे अकरावी-बारावी विज्ञान शाखेच्या डमी महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत केवळ कागदोपत्री चालणाऱ्या आणि हजारो विद्यार्थ्यांच्या बोगस उपस्थितीवर फोफावलेल्या या शिक्षण व्यवसायाला आता केंद्र व राज्य सरकारच्या डिजिटल देखरेखीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ‘फक्त प्रवेश घ्या आणि थेट बोर्डाची परीक्षा द्या’ हा जुना फॉर्म्युला आता मोडीत निघणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत अकरावी-बारावी विज्ञान शाखेची असंख्य कनिष्ठ महाविद्यालये उभी राहिली आहेत. शहरात मालेगाव रोड, पूर्णा रोडसह विविध भागांत डमी कॉलेजचे जाळे विस्तारले आहे. कोचिंग क्लासेस आणि काही महाविद्यालय व्यवस्थापन यांच्यातील ‘अघोषित सामंजस्या’मुळे विद्यार्थी दिवसभर कोचिंग क्लासेसमध्ये घाम गाळत असत, तर महाविद्यालयात त्यांची केवळ कागदावर शंभर टक्के उपस्थिती दाखवली जात होती. मात्र आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या ‘सिक्स-ए फ्रेमवर्क’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रिअल टाईम उपस्थिती प्रणालीमुळे हा खेळ थांबणार आहे.
नव्या नियमानुसार वर्गशिक्षकांना दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डेटा थेट डिजिटल डॅशबोर्डवर जमा होणार आहे. शिक्षण उपसंचालक किंवा जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्यास ॲपवरील उपस्थिती आणि वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित संस्थांवर थेट फौजदारी किंवा प्रशासकीय कारवाई होणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे डमी कॉलेजचे साम्राज्य धोक्यात आले असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS