Homeताज्या बातम्या

शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ? एक्स-रे टेक्निशियन गायब, सेवकाकडूनच एक्स-रे काढल्याचा धक्कादायक प्रकार

नांदेड : विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसीएच) एक्स-रे विभागात अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकार

पथदिवे बंद, मालेगाव रोडवर अंधाराचे साम्राज्य; उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका वाढला
लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
नांदेड स्कॉलर स्पर्धा परीक्षेत दुर्वा फड प्रथम


नांदेड : विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसीएच) एक्स-रे विभागात अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकार उघडकीस आला असून, प्रशिक्षित एक्स-रे टेक्निशियनऐवजी एका सेवकाकडून रुग्णांचे एक्स-रे काढले जात असल्याचा आरोप समोर आला आहे. हा प्रकार खरा असेल, तर तो केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाच नाही, तर हजारो रुग्णांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळ करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विष्णुपुरी येथील हे शासकीय रुग्णालय मराठवाड्यासह सीमावर्ती भागातील हजारो रुग्णांसाठी आधारवड मानले जाते. मात्र, या रुग्णालयातील काही विभागांमध्ये शिस्त, नियंत्रण आणि जबाबदारीचा अभाव असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशातच एक्स-रे विभागातील हा प्रकार समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्स-रे काढण्याची जबाबदारी असलेला टेक्निशियन नियमितपणे विभागात उपलब्ध नसल्याने हे काम एका सेवकाकडे सोपविण्यात आल्याचा आरोप आहे. किरणोत्सर्गाशी संबंधित आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेले हे काम अधिकृत आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडूनच केले जाणे अपेक्षित असताना, सेवकाकडूनच ही जबाबदारी पार पाडली जात असल्याचा प्रकार धक्कादायक मानला जात आहे. विशेष म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, संबंधित विभागप्रमुख आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली हा प्रकार किती दिवस सुरू होता? याची माहिती प्रशासनाला नव्हती का? की सर्व काही माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एक्स-रे यंत्रणा हाताळताना विशिष्ट प्रशिक्षण, किरणोत्सर्ग सुरक्षिततेचे नियम आणि तांत्रिक दक्षता आवश्यक असते. अशा परिस्थितीत अनधिकृत व्यक्तीकडून एक्स-रे काढले जात असतील, तर चुकीचे निदान, अनावश्यक किरणोत्सर्ग आणि रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित टेक्निशियन, विभागप्रमुख आणि जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने या गंभीर आरोपांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. रुग्णांच्या जीवाशी संबंधित अशा संवेदनशील विभागात जर सेवकाकडून काम करून घेतले जात असेल, तर हा केवळ एका कर्मचार्‍याचा हलगर्जीपणा नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा नमुना असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात प्रशासन दोषींवर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे चौकशीच्या नावाखाली फाईल दडपली जाणार, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS