Homeताज्या बातम्या

गुन्हेगारांच्या गराड्यात खाकीचा वाढदिवस! अर्धापूर पोलिसांच्या ‘बर्थडे पार्टी’चा व्हिडिओ व्हायरल, पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा वादात

नांदेड : कायद्याचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारा धक्कादायक प्रकार नांदेड

NEET पेपरफुटी प्रकरणात नांदेड कनेक्शन उघड; कदम कुटुंबाला सीबीआयचे पुण्यात हजर राहण्याचे आदेश
’पत्रकारीते’च्या आडून जुगाराचा डाव!माजी शिक्षणाधिकार्‍यांसह बड्या धेंडांवर पोलिसांची धाड; 9 जुगारमल्ले गजाआड
गोदावरीत अवैध रेती उपशावर पोलिसांचा मोठा प्रहार; 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड : कायद्याचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) विष्णू कन्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कथित पार्टीत गंभीर गुन्ह्यांतील आरोपी मुक्तपणे वावरत असल्याचा आणि पोलिसांसोबत केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काही सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती पोलिसांसोबत अगदी स्नेहाच्या वातावरणात दिसत आहेत. यामुळे गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील अंतर संपले आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीत खून, विनयभंग, ॲट्रॉसिटी, मारामारी आणि जुगार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये नाव असलेले आरोपी उपस्थित होते. विशेष म्हणजे, या वाढदिवस सोहळ्याचे आयोजनही अशाच एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

नेहमी कायद्याची भाषा करणाऱ्या पोलिसांचा आरोपींसोबतचा हास्यविनोद आणि मैत्रीपूर्ण वावर समोर आल्याने खाकीच्या निष्पक्षतेवरच संशय निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. संबंधितांचे जबाब नोंदवून वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणात केवळ चौकशीचा फार्स होणार की संबंधित अधिकाऱ्यावर प्रत्यक्षात कठोर कारवाई केली जाणार, याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS