Homeताज्या बातम्या

कर्जतच्या संत सद्गुरु गोदड महाराज मंदिराला मिळणार मूळ पुरातन स्वरूप; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणे दगडी व कोरीव काम सुरू

कर्जत : कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या संत सद्गुरु गोदड महाराज मंदिराचे मूळ पुरातन स्वरूप पुन्हा उभे करण्याचा संकल्प संत सद्गुरु गोदड महाराज न्यासाने

कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी बांधून ठेवलेली ११ गोवंशीय जनावरे ताब्यात, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांचा कर्जतमध्ये नागरी सत्कार
सोनमाळी कन्या विद्यालयाचा ‘कर्मवीर’ पारितोषिकाने गौरव

कर्जत : कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या संत सद्गुरु गोदड महाराज मंदिराचे मूळ पुरातन स्वरूप पुन्हा उभे करण्याचा संकल्प संत सद्गुरु गोदड महाराज न्यासाने हाती घेतला असून, या ऐतिहासिक कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणे या मंदिराचे दगडी, कोरीव आणि कलाकुसरयुक्त मूळ वैभव भाविकांना पुन्हा अनुभवता यावे, यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती न्यासाचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी दिली.

काळाच्या ओघात मंदिराच्या मूळ दगडी बांधकामावर करण्यात आलेले फरशा, सिमेंट व इतर कृत्रिम आच्छादन काढून ऐतिहासिक बांधकाम खुले करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत न्यासाचे सचिव तथा अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, रमेश तोरडमल आणि मंदिराचे पुजारी प्रमोद काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी भव्य रथोत्सवापूर्वी मंदिराचे पूर्ववैभव पुनर्स्थापित करण्याचा न्यासाचा मानस आहे.

शशिकांत पाटील यांनी सांगितले की, संत मीराबाई यांच्या वंशपरंपरेतील गोदड महाराजांनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतल्यामुळे या तीर्थक्षेत्राला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. सध्या अन्नछत्र मंडळाच्या वतीने दररोज भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. तसेच महाराजांचे ऐतिहासिक पोशाख, हस्तलिखिते आणि इतर वस्तू जतन करून भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जीर्णोद्धार कामासाठी भाविकांनी केवळ अधिकृत न्यासाकडेच देणगी जमा करून पावती घ्यावी, असे आवाहनही न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.

“गोदड महाराज मंदिराचे मूळ दगडी स्वरूप जतन करणे हा केवळ जीर्णोद्धाराचा उपक्रम नसून आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या संवर्धनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भाविकांच्या सहकार्याने हे पवित्र कार्य निश्चितपणे पूर्णत्वास जाईल.” — प्रवीण घुले (उपाध्यक्ष, संत सद्गुरु गोदड महाराज ट्रस्ट, कर्जत)

COMMENTS